Tuesday, April 24, 2012

मंदिर


आपण इथं या वेळी का आलोय ?


आपल्या बौद्धिक आणि कलासक्त वातावरणाचा अभिमान असणा-या लोकांच्या शहरातलं हे श्रीमंत गणेशाचं प्रसिद्ध मंदिर आता बंद होईल थोड्याच वेळात.सकाळपासूनच रीघ लागलेली भक्तांची संख्या आता बरीच कमी झालीय. तरीही अजून काही थोडेजण आहेतच या मूर्तीसमोरच्या छोट्याशा जागेत. त्यापैकीच मी एक. 


वातावरण नेहमीप्रमाणेच प्रचंड तेजाळलेलं. सोन्याने अंगभर मढवलेला गणेश सामावून घेताना डोळे विस्फारताहेत. अर्धअधिक मंदिर चांदीच्या चमचमाटात दबून गेलंय. चारी बाजूंनी मारा होत असलेल्या प्रकाशामुळे या सगळ्या झगमगाटात अजूनच भर पडते आहे. गेल्या काही वर्षात या मंदिराची किर्ती बरीच पसरली आहे. इथल्या गणेशमूर्तीचा ठाशीव घाट लोकप्रिय आहे. शहरातल्या पानवाल्यापासून एखाद्या मोठ्या संस्थेच्या कार्यालयापर्यंत ती प्रतिमा सर्वत्र दिसते. चतुर्थीला भरपूर फळं, फुलं वापरून केलेली मंदिरातली आरास, गणेशोत्सवात मंदिराने खेचलेली भक्तांची संख्या, रात्री आरामात निघणारी त्याची प्रकाशमान विसर्जन मिरवणूक, कोण्या भक्ताने वाहिलेलं सोनं हे सगळं अत्यंत कुतूहलानं चर्चिलं जातं. दिवसेंदिवस या मंदिराची दानपेटी देणग्यांचे विक्रम करते आहे. हा गणपती नवसाला पावतो असं म्हणतात. अनेक श्रीमंतांच्या नवसाला तो पावला असावा !

इथं गणेशाचं दर्शन घेताना माझे हात नेहमीच क्षणभर स्तब्ध होतात. नजर एका जागी ठरत नाही. प्रत्येक वेळी ती मूर्ती नवीन वाटते. त्या सगळ्या झगमगाटाचा भार मनाला फार पेलता येत नाही. मग ते दर्शन नमस्कार करायचा, प्रसाद घ्यायचा आणि पुन्हा चप्पल काढलेल्या ठिकाणी जायचं, असं औपचारिक होतं....


पण आज इथे थोडा वेळ बसावसं वाटतंय.


ही आभूषित मूर्ती..सुंदर दिसतेय...कोणी घडवली असेल ती?..ज्याने घडवली त्याची गणेशावर श्रद्धा असेल?..कुठला भाव ओतला असेल त्याने ती घडवताना?.. सर्वसामान्य लोकांच्या मनातही या मूर्तीला नमस्कार करताना कुठल्या भावना येत असतील?..भक्तीभावाने केल्या जाणा-या नमस्कारांत कुठेतरी या सोन्याच्या झळाळीचं आकर्षण मिसळलेलं असेल का?..गणेशालाच ठाऊक! तशी या शहरात गल्लोगल्ली गणेशाची छोटी मोठी मंदिरं आहेत. त्या त्या गल्लीतल्या लोकांची त्या त्या गणेशावर श्रद्धा आहे. पण याच मंदिरात भक्त दूरदूरून येऊन गर्दी करतात.


मंदिरात येणा-या प्रत्येक व्यक्तीला आपण 'भक्त' म्हणतो. देवावर असलेला ठाम विश्वास म्हणजेच भक्ती असं म्हणतात. त्या अर्थाने येणारा प्रत्येक माणूस 'भक्त' म्हणावा काय ?..संतांचा असा स्वतःच्याही पलिकडे विश्वास त्यांच्या देवावर होता. आज या मूर्तीमध्ये असलेल्या देवत्त्वावर माझा पूर्ण विश्वास आहे असं तिच्या भोवती लगबग करणारे पुजारी तरी छातीठोकपणे सांगू शकतील ?


थोडा पुढे डावीकडे बसलेला एक विशीतला मुलगा पुढे मागे झुलत, प्रमाणापेक्षा मोठ्या आवाजात आणि काहीशा कर्कश्श सुरात गणपती अथर्वशीर्षाची आवर्तनं करतोय. लोक त्याच्याकडे बघताहेत हे त्याला कळत असावं. तरीही एका उंच पट्टीत निर्विकार आणि यांत्रिकपणे त्याचं पठण सुरू आहे. तो उच्चारत असलेल्या शब्दांचा अर्थ त्याला माहित आहे का?


त्याच्यासारखी अनेक माणसं आहेत. ती पोथ्या वाचतात. पूजा करतात. अभिषेक करतात. व्रतं करतात. उपास करतात. नवस बोलतात. तो फेडतात. ठराविक दिवशी ठराविक देवाला जातात. ठराविक काळात ठराविक देवस्थानांना भेटी देतात... या सगळ्यामागची प्रेरणा नेमकी काय असेल?.... आपण का आलोय इथे?.. समोरच्या शाडूच्या मूर्तीत गणेश नावाच्या देवाचा अंश आहे असं आपण मानतो..मानतो!..खरंच तसं असेलच असं नाही.


थोडं पुढे एक कुटुंब बसलंय. दूरवरून आलं असावं. त्यातली एक छोटीशी मुलगी फारच चुळबूळ करते आहे. तिचे वडील तिला नमस्कार करायला शिकवताहेत. पण ती त्या डावीकडच्या मोठ्याने पठण करणा-या मुलाकडेच टकमक बघते आहे.


देवावर आपण ठेवलेली श्रद्धा म्हणजे लहानपणापासून लावल्या जाणा-या अशा सवयीच तर नसतील?


आपण अमुक अमुक देवाची पूजा करावी हे आपला धर्म, जात, आर्थिक स्तर यांच्यानुसार आपल्यावर लहानपणीच बिंबत जातं. न कळत्या वयातच आपण त्यावर विश्वास ठेवायला शिकतो. मग पुढच्या सगळ्या धार्मिक मानल्या जाणा-या कृती अशा सवयीच्या विश्वासाआधारेच होतात.


कुठल्या तरी देवावर श्रद्धा ठेवणं हीसुद्धा आपली एक मुलभूत गरज असावी. आपल्याकडे बघणारं कुणीतरी आहे या जाणीवेमागे दडलेल्या सुरक्षिततेच्या भावनेसाठी ती निर्माण होत असेल का?

'मी' चा अहंकार पूर्णपणे विसरणं म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचं शिखर गाठल्याचं लक्षण, असं म्हणतात. कुठलाही धार्मिक विधी करताना ही 'स्व' विसरण्याची सुरूवात होते? व्यावहारिक जगातला देवघेवीचा नियम लावूनच ते बहुधा केले जातात. आत्ता इथेसुद्धा गणेशापुढे नतमस्तक होताना कितीतरी जणांनी काय काय मागितलं असेल. खरं तर बाहेर चप्पल काढताना अजून एक सूचना केली जायला हवी, 'मी पणाही इथेच सोडावा !

'समोरचा तुकतुकीत त्वचेचा, गणेशासारखाच लंबोदर पुजारी वर्ग आता आवराआवरीला लागलाय. मूर्तीच्या अंगावरचे दागिने उतरवायला सुरूवात झाली आहे. गणेशाचे खांदे, हात, पोट हळूहळू मोकळे होत आहेत त्या तेजाच्या भारातून. जगाची विघ्नं हरणा-या त्या गणाधीशानंही सुटकेचा निश्वास सोडला असेल मनातल्या मनात. खरंच...ही मूर्ती जिवंत असती तर.. अंगावरचं ओझं हटल्यानंतर गणेशानं चारी हात आणि सोंडेसहित आळोखेपिळोखे दिले असते. दिवसभर मांडी घालून मुंग्या आल्या म्हणून पाय झटकले असते. भक्तांच्या त्याच त्याच मागण्या ऐकून कान किटलेला गणेश 'जरा फिरून येतो' म्हणून पुजा-याला टाटा करून गेला असता...खरंच.. मजा आली असती...


कल्पनेच्या राज्यात फेरफटका मारणं हा मनोरंजनाचा विनाखर्चाचा उत्तम उपाय आहे.


दागिने काढल्यानंतरची मूर्ती किती साधी वाटतेय. एरवी ह्या गणेशाचं हे रूप बघायला मिळालं नसतं. या वेळेचा हा एक दुर्मिळ फायदा आहे !
1 comment: