Friday, May 18, 2012

बाळ

एखादं लहान बाळ...अगदी काही महिन्यांचंच असतं...आपल्याकडे जेव्हा एकटक बघू लागतं तेव्हा किती वेगळी भावना मनात येते...


त्याची नजर आपल्यावर खिळलेली असते... निर्मळ आणि स्वच्छ ....चेह-यावरचा भावही अगदी नितळ असतो...आपण ती नजर तोडून दुसरीकडे बघू शकत नाही. ही त्याची नजर कुणातही वात्सल्याची भावना जागी करू शकते.


लहान बाळाचं रूप अगदी गोंडस असतं...त्याचा स्पर्श किती हवाहवासा...इवलेसे हात-पाय, चेह-यावर उठून दिसणारे पाणीदार डोळे...ब-याचदा काळेभोर असे...हात लावला तर काही होईल की काय असं वाटायला लावणारी नाजूक जिवणी, मऊसर त्वचा, डोक्यावरचं अलवार बाळसं....आणि नाजूकतेची परिसीमा गाठणा-या कानाच्या चुटूकशा पाळ्या...त्या टोचलेल्या असतात. त्यातल्या रिंगा ते बाळसेदार रूप आणखीनच खुलवतात...


या सगळ्याला कळत नकळत स्पर्श करताना आपल्या हालचालीही किती हळव्या होत असतात. आपण एरवी वावरताना ज्या बेफिकीरीने वावरत असू ते आपोआपच आता सावध हालचाल करू लागतो. हळुवारपणा आणू लागतो. मला तर सगळ्यात जास्त वेड लावते ती त्याची डुगडुगणारी मान...तिला आपण मागून हलकेच आधार देतो तेव्हा आपल्या जगाला सरावलेल्या मनाची त्या नुकत्याच आलेल्या जीवाच्या कच्चेपणाशी सांगडच घालतो जणू...
कडेवर घेऊन बाळाला झोपवणं हा एक अत्यंत सुखद अनुभव असतो. त्याचा चेहरा मधूनच खांद्याला स्पर्श करतो..छोटे बाळसेदार हात मानेभोवती पडतात..तेव्हा कशाचं काय माहित पण निर्भेळ असं समाधान वाटतं. त्याला हळुहळु थोपटताना त्याच्याबरोबर आपल्यालाही उगाचच सुरक्षित वाटू लागतं. खरं तर आपण त्याला विश्वास देत असतो...आपल्या असण्याचा...पण दुसरीकडे घेतही असतो स्वतःसाठी...


लहान बाळ म्हणजे त्याच्या अवतीभवतीच्या छोट्याशा जगाचं केंद्र होऊन बसतं. सगळ्यांनाच त्याच्याशी काहीबाही बोलायचं असतं...त्याला हातात घ्यायचं असतं...त्यानं आपल्यालाच प्रतिसाद द्यावा असं वाटत असतं...


त्याला खेळवताना, रडलं की शांत करताना आपण नक्की काय करत असतो ?
त्याच्या ब-यावाईट संवेदना ओळखण्याचा प्रयत्न करतो आपण. ज्याचे व्यक्त होण्याचे आपल्यासारखे ठोकताळे अजुन तयार झालेले नाहीत त्याची अभिव्यक्ती समजून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. त्याच्याशी त्याच्यासारखंच विशुद्ध भावनांचं व्हावं लागतं...म्हणूनच..बाळाला सांभाळणं हे एक आव्हान असतं.
त्याला आपण जिंकू शकलो की स्वतःलाच जिंकल्याचा आनंद होतो क्षणभर.6 comments:

 1. फारच सुंदर.. "त्याला हळुहळु थोपटताना त्याच्याबरोबर आपल्यालाही उगाचच सुरक्षित वाटू लागतं. खरं तर आपण त्याला विश्वास देत असतो...आपल्या असण्याचा...पण दुसरीकडे घेतही असतो स्वतःसाठी..."
  अनेक दिवसांनी तुझाकडून खूपच चांगली पोस्ट वाचायला मिळाली...एकदम तरल नी संवेदनशील मनाने लिहिलेली आहे हि पोस्ट..."बाळाला सांभाळणं एक आव्हान असतं.."याने केलेला समारोप तर एकदम मस्तच...अजून एक महत्वाचे हि पोस्ट केवळ ब्लोग, फेसबुक पुरती मर्यादित न राहता चतुरंग, मिळूनी सार्या जणी मध्ये प्रकाशित होईल असे पहा...मातृत्वाची व्याखा समाजपरत्वे बदलत आहे; अश्या परीस्थित तुझी भावना अतिशय सुखावणारी आहे..केवळ स्त्री साठी नव्हे तर सर्वांसाठीच....मी हे जास्त अधिकारवाणीने सांगू शकतो कारण आमचा गप्पी...जसं वर्णन केलं आहेस अगदी तसाच गप्पी होता..
  "ज्याचे व्यक्त होण्याचे आपल्यासारखे ठोकताळे अजुन तयार झालेले नाहीत त्याची अभिव्यक्ती समजून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. त्याच्याशी त्याच्यासारखंच विशुद्ध भावनांचं व्हावं लागतं.".
  आमच्या घरात हे सर्वात जास्त चांगले जमले असेल तर ते विरुभाऊला.....
  लहान बाळाला तुमच्याजवळ असुरक्षित वाटत असेल तर वाट्टेल ते करा; ते तुमच्या जवळ येणार नाही...म्हणायला स्वतःच्या कोशात जगणारे पण प्रत्यक्षात सभोवतालच्या जगाचं केंद्र असलेलं बाळ...
  आमच्या गप्पिच्या लहानपणच्या आठवणी टवटवीत केल्याबद्दल thanks sheetal..
  तुझ्या आत्तापर्यंतच्या पोस्ट मधली सर्वोत्तम...
  खूपच मस्त..लिहित राहा..

  ReplyDelete
  Replies
  1. अत्यंत धन्यवाद सर या प्रतिक्रियेबद्दल. गप्पी आता खूपच मोठा झाला आहे. त्यामुळे एवढ्या वर्षांपूर्वीच्या तुझ्या आठवणी ताज्या झाल्या ही फारच मोठी गोष्ट म्हणायची.

   Delete
 2. sheetal mastch...! sukhad an taral...

  ReplyDelete
 3. tuzya likhanachi hi shade mala mahit navati. tooooo goood.

  ReplyDelete
 4. thanks Heena and Sonali. Your feedbacks are really encouraging for me.

  ReplyDelete
 5. wahhh.. chaan... mastach... bhari...

  ReplyDelete