Thursday, October 25, 2012

सहजीवन


अडीच तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्याच्या औंध भागात काम
करताना ज्या अनेक लोकांच्या ओळखी झाल्या त्यातल्याच या दोन. पण त्या दोन्हीत एक गोष्ट समान होती. एक परिपक्व, समजदार सहजीवन.

नेरूरकर काका हे नोकरीतून रिटायर झालेले. चित्रकला हा त्यांचा छंद ते या निवांत वेळेत आता जोपासत होते. पक्ष्यांची वेगवेगळी चित्रं त्यांनी फोटोवरून तयार केली होती. त्यांच्या घरी कशाच्या निमित्ताने जाणं झालं आठवत नाही, पण गेले तेव्हा हॉलमध्ये बसलेली असताना आतून एक बाई आल्या. 'तुला एक जोक सांगू' असं म्हणून मला एकच विनोद पुन्हा पुन्हा सांगू लागल्या. त्या मनोरूग्ण होत्या हे कळत होतं. त्यांच्या मागोमागच काका बाहेर आले आणि त्यांनी त्यांना समजावून आत पाठवलं.

नंतर तीन-चारदा त्यांच्याकडे जाणं झालं. एकदा काकांनी सांगितलं, त्यांचा धाकटा तरूण मुलगा अचानक गेल्यामुळे त्यांच्या पत्नीला मानसिक धक्का बसला आणि तेव्हापासून त्यांची सगळी अवस्था ही एखाद्या लहान मुलासारखीच झाली. मला हे ऐकून इतकं आश्चर्य वाटलं नाही जेवढं काकांचा हे सांगतानाचा सूर बघून वाटलं. अगदी नेहमीसारखाच मृदू होता तो. त्यात उगाचच दुःख वगैरे असल्याचं जाणवलं नाही.

काकांनी एकदा त्यांची चित्रं दाखवली. एकदा त्यांचा फोटोंचा अल्बम दाखवला. बायकोचं कौतुक फोटो दाखवताना ते सांगत होते. त्यांचं अरेंज मॅरेज. पण तरी त्या दोघांचं एकमेकांशी इतकं जमलं की प्रेमात पडलेल्यांचंही काय जमावं. दोघांना नाटकाची आवड. लग्नानंतरच दोघंही एका ग्रुपशी जोडले गेले होते. नंतर मात्र काकांना या गोष्टीला वेळ द्यायला जमेना तेव्हा त्यांनी बायकोलाच पूर्ण सपोर्ट द्यायचं ठरवलं. फोटोतून बाई किती गोष्टींमधून सक्रिय होत्या ते कळत होतं. त्यांच्याविषयी सांगताना काकांच्या बोलण्यात त्यांच्याविषयीचं प्रेम, आदर जाणवत होता. या वयात येणारी उदासिनता त्यांच्यात नव्हती. एक शांतता होती. मुलगा त्यांचाही गेला होता. त्यानंतर बायकोचा हा धक्का त्यांना मिळाला होता. पण याविषयी तक्रारीचा सूर.. छे. सूक्ष्मसाही नाही.

एक काळ त्यांनी एकमेकांबरोबर चांगला घालवला होता. ते तर चांगलंच होतं. पण आता काही वाईट घडलंय. त्याचाही स्विकार होता. पण हा त्यांचा स्विकार दुःखातून नाईलाजाने आलेला नव्हता किंवा अगदीच आशावादीही नव्हता. जे आहे ते एका संतुलितपणातून ते भोगत होते इतकंच. एखाद्या तीन-चार वर्षांच्या मुलाची घ्यावी तशी बायकोची काळजी ते घेत होते मात्र त्याचा ताण त्यांच्या छंद जोपासण्यावर, लोकांशी असलेल्या नात्यांवर फारसा पडला नव्हता. घरात कुणी आलं की ते बायकोलाही त्यांची ओळख करून देत. त्यांना उगाचच त्यांची लाज वगैरे वाटत नसे. हे सगळं करताना ते स्वतःचा आनंदही सर्जनातून शोधत होते हे विशेष. एक वेळ हे सगळं एका स्त्रीने केलं असतं तर त्याचं तेवढं काही वाटलं नसतं.

म्हणूनच काकांचा हा दृष्टिकोन खूपच लक्षात राहिला. त्यांच्या तरूणपणातल्या आणि आताच्या सहजीवनाची जी सूक्ष्मशी झलक दिसली त्यामुळे तर जास्तच.

---------------

दुस-या काकांची ओळख पाषाणमध्ये झाली. तिथल्या अथश्री सोसायटीमध्ये ते जोडपं राहात होतं. न्युमरॉलॉजिस्ट काका सोसायटीमध्ये प्रसिद्ध होते. शिवाय कुठल्यातरी वाद्यातही प्रवीण होते. तिथल्याच दुस-या आजोबांकडून त्यांच्याविषयी कळलं म्हणून कुतूहलाने त्यांना मी भेटायला गेले.

काका अपंग. गुडघ्यांपासून पुढचे दोन्ही पाय नाहीत. ते सतत एका खुर्चीवर बसून. अगदीच गरज पडली तर नकली पायांचा आधार. काकू मात्र अगदी धडधाकट. काकांचा स्वभाव बोलका. काकूंचं मात्र उलट असावं. त्या काहीशा अबोल, आपलं काम शांतपणे करत राहणा-या.

पुन्हा त्यांच्याकडे कामाच्या निमित्ताने जाणं झालं तेव्हा काकांनी ब-याच गप्पा मारल्या. उत्साहाने त्यांची बासरी वाजवून दाखवली. संख्याशास्त्रावर बोलले. आमचं हे चालू असताना काकू तिथे शांतपणे कामं करत वावरत होत्या. मला पाणी आणून दे, त्यांचं स्वतःचं काही काम कर, मधेच काकांनी काही आणायला सांगितलं तर ते आणून दे असं त्यांचं चाललं होतं. मला राहून राहून या जोडीचं फार आश्चर्य वाटत होतं.


बोलताना काका मधेच म्हणाले, ' सगळं ही असल्यामुळे शक्य होतं. तिच्यात खूप डिटरमिनेशन आहे.'

ही संधी साधून मी त्यांना विचारलंच मग त्यांच्या लग्नाबद्दल. त्यांचं लव्ह मॅरेज असल्याचं ऐकून मला जास्तच कुतूहल वाटलं. त्यांनी सांगितलं, अठरा वर्षांचे ते असताना एका अपघातात त्यांचे दोन्ही पाय गेले. तेव्हापासून पुढे नकली पायांचाच आधार. ते आर्किटेक्ट होते. त्यांनी जिथे नोकरी केली तिथेच त्यांना काकू भेटल्या. मैत्री झाली आणि ते प्रेमातही पडले. लग्नाचा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र काकांनी काकूंना सगळी परिस्थिती समजावून दिली. अगदी आपले नकली पाय काढून त्यांना दाखवले. कारण तोपर्यंत त्या पायांमुळे त्यांच्या अपंगत्त्वाची फारशी जाणीव व्हायची नाही.

हे सगळं बघूनही काकूंचा निर्णय कायम होता. पण घरच्यांना समजावणं अवघड होतं. त्यातून ते दोघंही वेगळ्या प्रांतातले. काकू कच्छ प्रांतातल्या, बहुधा रजपूत तर काका मराठी ब्राह्मण. पण काकू ठाम राहील्या आणि शेवटी त्यांचं लग्न झालंच.

काकूही ही चर्चा ऐकत होत्या. न राहवून त्यांना विचारलं, अशी कोणती गोष्ट होती की ज्यासाठी काकांचं अपंगत्वही तुमच्यासाठी बाजूला पडलं?

त्यांचं उत्तर अगदीच साधं. ते कसे आहेत हे त्यांना माहित होतं. त्यांच्याशी जुळत होतं. त्यामुळे दुस-या कुणाचा विचार करावा असं कधीच वाटलं नाही. बस्स.

अवघड होतं. आयुष्यभर एक मोठीच जबाबदारी त्यांनी घेतली होती. पण आवडीच्या माणसाची घेतली होती. त्यात त्यांचं समाधान होतं. आज इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या समाधानात काही फरक पडला नव्हता हे दिसतच होतं.

मुळात एक अपंग माणूस आणि धडधाकट माणूस असं जोडपं. त्यातही त्यांचा प्रेम विवाह आणि इतक्या वर्षांनंतरही त्यातला आनंद, समाधान टिकून राहणं हे सगळं दुर्मिळ होतं माझ्यासाठी. एका प्रगल्भ सहजीवनाचा हा दुसरा अनुभव.

2 comments:

  1. 'मुलगा त्यांचाही गेला होता'..'त्यांना उगाचच त्यांची लाज वगैरे वाटत नसे.'.. हं..साध्या वाटणाऱ्या आजूबाजूच्या माणसांमध्येच मोठी ताकद आणि समजूतदारपणा असतो.. 'पण हा त्यांचा स्विकार दुःखातून नाईलाजाने आलेला नव्हता किंवा अगदीच आशावादीही नव्हता'.. उगीच सगळं गुडी-गुडी न लिहिताही छान लिहिलं आहेस.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद स्नेहलताई.

      Delete