Thursday, January 31, 2013

समान'राष्ट्रउभारणीसाठी युवक हवेत. समर्थ, समर्पित, ब्रह्मचारी...'

रामकृष्ण मठातलं एक व्याख्यान. शहरातल्या गजबजाटापासून दूर मठाच्या तळघरात शांततेत ती ऐकत होती.

'स्त्रियांनीही यात त्यांचं योगदान द्यायला हवं. जिथे स्त्रियांचा आदर, सन्मान केला जात नाही त्या समाजाचा विकास होऊ शकत नाही. स्त्रियांना शिक्षण मिळायला हवं. कारण स्त्रिया सुशिक्षित होतील तेव्हाच पुढच्या पिढ्याही सुसंस्कारीत होतील...' सोलापूरचे ते प्रसिद्ध व्याख्याते म्हणाले. तेव्हा ती ऐकायचं थांबली.

सरसकट सगळ्या स्त्रियांचा आदर केला जावा, हे सांगणं समाजातल्या मेन स्ट्रीमला म्हणजेच पुरूषांना. आयुष्यात अनेक गोष्टी करा. त्यातली ही एक गोष्ट. आदर करा कारण स्त्रिया माता असतात. स्त्रियांना शिक्षण मिळावं कारण त्यांना पुढची पिढी घडवायची असते. राष्ट्रासाठी स्त्रियांचा सहभाग, नागरीक तयार करणं. म्हणजे पुरूष नागरीक तयार करणं, आणि पुढचे पुरूष नागरीक तयार करण्यासाठी पुढच्या स्त्रियांना तयार करणं. बस्स...एवढाच!

काय सांगताहेत हे? दबून गेलेले प्रश्नं तिच्या मनात आता पुन्हा गोळा होऊ लागले. समाज म्हणजे पुरूष. स्त्रिया हा या समाजाला पूरक असा फक्त एक घटक. प्रजनन आणि संगोपन यापलिकडे या अर्ध्या लोकसंख्येची समाजात काहीच भूमिका नाही?. हे भाषण कुणाला उद्देशून केलं जातंय? हे ऐकणा-या श्रोतृवर्गात स्त्रियांना गृहित धरलेलं नाही. हे आवाहन पुरूषांना आहे. 

शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या आवाहनाला आत्ता आपण कसा प्रतिसाद द्यावा हे तिला समजत नाही. सामाजिक विकासासाठी आपलंही काही योगदान असावं असं तिच्या वयाच्या मुलींना वाटत असेल तर त्यांना या भाषणातून काय मिळणार?   

त्या दिवशीचं व्याख्यान संपलं तसं तिने त्या प्रसिद्ध व्याख्यात्यांना विचारलं, 'स्त्रियांनी आई व्हावं, मुलांना वाढवावं यात त्यांना स्वतःचा विकास साधण्याची संधी कुठे असते? याचा अर्थ त्यांना जग समजून घेण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची संधी नाही काय? समाजात यापेक्षा वेगळा वाटा त्यांनी उचलू नये काय? 
काही उदाहरणं मिळाली. स्त्रियांची नैसर्गिक जबाबदारी आणि स्वभाव यामुळे त्या खूप महत्त्वाच्या असतात असं आश्वासक उत्तरही मिळालं. पण पूर्ण समाधान करेल असा विचार नाही. उलट तिची शंका आणखीनच बळकट झाली. मुळातच असं विचारण्याची गरज का पडावी? नैसर्गिक जबाबदारी हीच सामाजिक आणि वैयक्तिक जबाबदारी असं स्त्रियांसाठी कोणी का ठरवावं? त्यात हे नैसर्गिकरित्या असण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारे लादण्याचाच भाग जास्त दिसतो.

त्या दिवशी घरी जाताना जेवढ्या म्हणून बायका दिसल्या त्या सगळ्या भोळेपणाने ही जबाबदारी पार पाडताहेत असंच तिला वाटत राहिलं. त्या सगळ्यांची कीव करावीशी वाटली तिला.
-------------------

चालता चालता कानाजवळ काहितरी गुणगुणणं ऐकल्याचा तो तिचा कितवा प्रसंग होता कुणास ठाऊक...यावेळी तिचा संताप झाला खरा. हे गाणं, शिट्ट्या, कॉमेंट्स, या गोष्टी मुलींचा सहजपणा घालवतात. सतत सावध राहायला लावतात. अस्वस्थता आणतात. मुली म्हणजे येता जाता कुणीही काहीही करू शकेल अशा सॉफ्ट टार्गेट्स याची जाणिव करून देत राहातात.

एकदा तिच्या अंगावर उगाचच पिळलेल्या एक्सिलरेटरमुळे धुरळा उडाला. तेव्हाही ती अशीच अस्वस्थ झाली. एक्सिलरेटर, गाणं, गणेशोत्सवाचं मैदान, बसमधली गर्दी, चहावाला...फोनवर बोलणारा मुलगा, हॉटेलचा गल्ला...बिल्डींगच्या खाली बसलेली मुलं...झर्रकन जाणा-या बाईक्स...सगळा धुरळा...

काय मिळतं यातून नक्की? क्षणभर असं कुणाचं तरी लक्ष वेधलं जाण्यात कोणता आनंद असतो? निरर्थक उन्माद.
हल्ली तिला या छुप्या आनंदाचा खूपच राग येतो. इतर मुली सवयीने या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. अर्थात तिच्याकडेही तोच पर्याय आहे. पण तरीही येणा-या या रागाचं काय करायचं हा तिच्यासमोरचा एक प्रश्न आहे.
सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांच्या वावरण्यावर यामुळे खूपच बंधनं येतात. त्यांचा मोकळेपणा हरवतो. हॉटेल्स, थिएटर्स अशा अनेक ठिकाणी एकट्या बायकामुलींना पाहण्याची सवय अजुनही लोकांना नाही.
--------------------

'धार्मिक वाद हे निरर्थक असतात. त्यात स्त्रियांना कुठे मोजलं जातं?' तिचा एक मित्र एकदा म्हणाला.  

सगळ्या धर्मसत्ता पुरूषांच्याच तर हाती आहेत. स्त्रियांच्या अर्ध्या जगाला धार्मिक बाबींत तर राहू दे पण कितीतरी सामान्य गोष्टीतही मोजलंच जात नाही. म्हणूनच सार्वजनिक स्वच्छतागृहांसारख्या प्राथमिक गरजेसाठीसुद्धा आवाज लावून धरावा लागतो.

ती लहान होती तेव्हापासूनच तिच्या हे लक्षात यायला लागलंय. भविष्य वाचताना 'सुंदर स्त्रीचा सहवास मिळेल', 'स्त्रीपासून नुकसान' ही वाक्यं तिला जमिनीवर आणतात. म्हणजे हे फक्त पुरूषांसाठी आहे. 'घरातल्या स्त्रियांना कपडालत्ता, दागिने इत्यादी सुखं देऊन समाधानी करा..' असा पुरूषत्त्वाची लक्षणे सांगणारा एक श्लोक तिच्या अजुन लक्षात आहे. रामकृष्णांच्या शिष्यांमध्ये सगळेजण पुरूषच कसे? ब्रह्मचर्य हे फक्त पुरूषांच्याच संदर्भात का? अनेक देवळांमध्ये स्त्रियांना प्रवेशाला मनाई कशासाठी? मग सहिष्णुतेचा अर्थ काय? अगदी आध्यात्मिक उन्नतीची शेवटची पायरी गाठलेल्या व्यक्ती ज्यांना सगळं जग सारखंच आहे त्यासुद्धा काळाला ओलांडणारा समानतेचा विचार का देत नाहीत? असे बरेच प्रश्नं तिला वेळोवेळी पडून गेलेत. 

आपल्याला मिळणारे विचार हे आताच्या परिस्थितीशी, जाणिवांशी मेळ खात नाहीत. त्यांचा मेळ कसा बसवायचा हे कुणी सांगत नाही. आपण फक्त रमतो जुन्या कल्पनांमध्ये.
पण जुनं म्हणजे काय...नवीन म्हणजे काय...कसं ओळखायचं...

अशाच विचारात एकदा तिने एकदा तिच्या वहीत लिहून टाकलं,
हे अर्धं जग आमचं आहे! 
इथल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध आमच्याशीही आहे!
आम्ही भोगत असतो घटनांचे स्वतंत्र परिणाम आणि लावत असतो आमचे स्वतंत्र अर्थं!
---------------

काय छापतात हे लोक. बायका ही सिरियसली घेण्यासारखी गोष्ट नाही असं ठरवूनच सगळं करतात की काय. एकच गोष्ट किती काळापासून चालू ठेवायची? महिलांसाठीचं ते एक प्रसिद्ध मराठी मासिक पाहून ती वैतागली. सौंदर्य! किती वेळा सांगायच्या, सुंदर दिसण्यासाठीच्या त्याच त्याच टिप्स? लेखात म्हणायचं मनाच्या सौंदर्याला महत्त्व असतं...आणि शेजारी इम्पोर्टेड क्रिम्सची जाहिरात. सौंदर्य, फिटनेस, मेहेंदी, स्वयंपाक यापलिकडे स्त्रियांचं जग नाही की काय.. मग कधीतरी स्त्रीभृणहत्या होऊ लागल्या की एकदम जागं असल्याचा आव आणायचा. 

सौंदर्य हे स्त्रीविश्वाच्या केंद्रस्थानी असतं! मुली आपल्या दिसण्याचा खूपच विचार करतात. हा विचार खरोखरच मूळचा असतो की पुन्हा थोपवलेला असतो? कारण स्त्रीसौंदर्य ही कल्पनाच मुळी पुरूषांच्या नजरेतली आहे. अनेक प्रेमकाव्यांचा आधार तीच आहे. पण ही प्रेमकाव्यं पुरूषांनीच केलेली आहेत आणि प्रेम वगैरे विषयांत स्त्रिया काय विचार करतात हे आता आता कुठे बाहेर येऊ लागलंय.


तुम्ही छान विशेषतः गो-या वगैरे दिसलात की कोणीही तुमच्या जवळ येईल असं सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिराती सांगतात. असं दिसलं की कामातही आत्मविश्वास येतो असं म्हणतात. सुंदर दिसणं ही बेसिक गरज बनून जाते मुलींसाठी. प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या सौंदर्याचा विचार म्हणजे अंतिमतः स्वयंकेंद्रित विचार. सुंदर दिसण्यामागची भावना भिन्नलिंगी व्यक्तीच्या आकर्षणाची. स्त्रियांच्या बाबतीत ही आकर्षून घ्यायची ताकद जितकी जास्त, तसं तिला महत्त्व. दुस-या व्यक्तीवर अवलंबून असलेली ही कसली ताकद?

'स्त्रीचं सामर्थ्य हे सौंदर्यात असतं आणि पुरूषाचं सौंदर्य हे त्याच्या सामर्थ्यात असतं!' एक प्रसिद्ध उथळ वाक्य. स्त्रियांचं सामर्थ्य कसलं..आकर्षून घेण्याचं! ज्यांच्याकडे असं देखणेपण नाही त्यांनी काय करावं? कितीही उथळ असली तरीही चटपटीतपणामुळे अशी वाक्यं सुविचार म्हणून आजही सांगितली जातात. या सगळ्याच गोष्टींचा परिणाम म्हणजे मुलींना त्यांचं सामर्थ्य खरोखरंच सौंदर्यातच असल्याचा साक्षात्कार होतो. यात आपल्या शरीरातल्या छोट्या मोठ्या कमतरताही मनात बसतात आणि जाता जात नाहीत. जगातल्या अनेक नकारात्मक प्रतिक्रियांचं कारण त्या बनतात. ती राहात असलेल्या हॉस्टेलमध्ये अशा अनेक मुली ती पाहाते आहे.  
---------------------

स्त्रियांचा विकास आजपर्यंत झाला नाही, त्यांचं अर्ध जग हे बंद दाराआडच राहिलं. कारण त्या सेवेकरी आहेत. जगताना जी दैनंदिन कामं करावी लागतात ती त्यांच्या वाट्याला आल्यामुळे इतर कुठल्याही गोष्टीत त्या लक्षच घालू शकत नाहीत. त्यामुळे अर्थातच आजपर्यंत त्यांचा वैचारिक विकास होऊ शकलेला नाही. जगात फेमिनिझमची दुसरी लाट आणणा-या 'द सेकंड सेक्स' या पुस्तकात मांडला गेलेला हा एक विचार आहे. हा वस्तुनिष्ठ विचार तिला खूपच लक्षात राहिला. तेव्हापासून घरातली कामं करणा-या बायका तिला सुसंस्कृत गुलामांसारख्या भासू लागल्यात. खरंच तर आहे. जगण्यासाठीची दैनंदिन कामं पार पाडणं हे घरातल्या स्त्रियांचंच कर्तव्य असतं. त्यांनी ती इतरांसाठी म्हणून कुठलाही अहंकार न बाळगता प्रेमाने करावी अशीही अपेक्षा असते. पण त्यामुळे वेळेअभावी त्या अनेक गोष्टी करू शकत नाहीत. या कामांत असलेलं कौशल्यं हे त्यांचं महत्त्व ठरवतं. त्यांच्या या कामाला नेमकेपणा, वेळेची शिस्त असं काहीही नसतं. त्या फक्त सदासर्वकाळ उपलब्ध असतात!   

घरात बाई कामाला असणं हे आर्थिक विषमतेचं लक्षण आहेच पण लैंगिकदृष्ट्या विषमता असणा-या समाजाचंसुद्धा लक्षण आहे. कारण घरात बाई कामाला असणं हे सोयीचं ठरतं ते त्या घरातल्या बाईलाच. त्या घरातल्या पुरूषांना या गोष्टीशी काहिही देणं घेणं नसतं... हिंदूत एका फिल्मच्या निमित्ताने आलेल्या लेखात म्हटलं होतं.    
---------------

For centuries women compensated for their fundamental fear of unworthiness by being attentive and responsive to the needs of others.   

स्त्रिया आणि सेवाभाव या दोन गोष्टी फारच जोडल्या गेल्यात. त्याच्यामागे ही अशी भिती असेल? ती मग आजुबाजूच्या बायकांबद्दल जसजसा विचार करू लागली तसं तिला ते खरंच वाटू लागलं. बायका इतर माणसांच्या छोट्या छोट्या गरजांचा फार विचार करतात. वुमेन आर सर्व्हर्स. आईच्या पिढीतल्या बहुतांश बायका अशाच आहेत आणि त्यांचं तसं असणं गृहित धरलेलं आहे. स्वयंपाक, धुणी-भांडी, इतर स्वच्छता अशा कामांतून घरातल्या इतरांना सेवा देतच त्यांनी आयुष्य घालवलंय. ही श्रमविभागणी म्हणतात. पण हे खूपच वरवरचं आहे..या श्रमांना प्रतिष्ठा नाही. ते कुठेच मोजले जात नाहीत. ज्या अर्ध्या जगालाच जिथे मोजलं जात नाही तिथे त्यांच्या श्रमांचं काय घेऊन बसायचं...आणि हे चार भिंतींच्या आतले श्रम जेव्हा नव्या व्यवस्थेत सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिक रूपात जातात तेव्हा त्यात वर्चस्व मात्र पुरूषांचं दिसून येतं. शतकानुशतकं स्वयंपाकघरात राबणा-या बायका नव्या 

हॉटेलसंस्कृतीत का दिसत नाहीत? त्या रिसेप्शनिस्ट असतात, 
टेलिफोनवरून मार्केटिंग करणा-या असतात, टिव्हीवरच्या अँकर असतात...जिथे प्रेझेंटेशनची गरज असते तिथे स्त्रिया असतात. 

आपल्या धार्मिक ग्रंथांनी स्त्रियांनी पुरूषांच्या केलेल्या अशा सेवेला थोर नैतिक बळ दिलंय. 

कार्येषु मन्त्री करणेषु दासी, भोज्येषु माता शयनेषु रम्भा ।
हिंदी चित्रपटांमधून हा श्लोक कितीतरी वेळा येतो. पत्नी मिळवावी जी सर्व प्रकारची सेवा उत्तमरित्या करू शकेल अशी. म्हणजे पुन्हा पुरूषांना उद्देशून. 

पुण्यातल्या एका प्रसिद्ध हॉटेलात स्वामी समर्थांचा स्त्रीवेशातला फोटो लावलाय. काय सांगायचं असावं त्यातून? अर्धनारीनटेश्वराचीही कल्पना आपल्याकडे आहे. पण बाकी कितीतरी गोष्टी त्याच्याशी विसंगतच दिसतात. शेषावर पहुडलेला विष्णु आणि पाय चेपत बसलेली लक्ष्मी असा लक्ष्मीनारायणाचा जोडाच आपली चांगल्या जोडप्याची आदर्श कल्पना असते.
--------------

स्त्रिया अशा सेवा देतात कारण त्यांना त्याबदल्यात पुरूषांकडून सुरक्षितता मिळत असते. मुळात ही सुरक्षिततेची गरज येते तरी कशातून? या विषमतेचा जन्म कुठे होतो?
शरीरात. स्त्रीशरीर मुळातच पुरूषाच्या तुलनेने दुर्बळ. मग सगळा खटाटोप येतो तो शरीर दुर्बळ कसं नाही किंवा असलं तरी मन कसं सहनशील आणि सामर्थ्यवान असतं हे समजावण्याचा. प्रजननाच्या निसर्गाने टाकलेल्या जबाबदारीमुळे त्यांचं शरीर नाजूक असतं. मग दुर्बळ आणि सबळ यांच्यात होतील असे व्यवहार याही ठिकाणी लागू होतात का?.मग समानता कशी आणायची?
शारिरीक दुर्बलतेतून येणारी असुरक्षितता हा मोठाच ड्रायव्हिंग फॅक्टर आहे स्त्रियांसाठी. त्यापुढे त्यांची स्व ची जाणीव टिकत नसावी. पुरूषांमध्ये ती प्रबळ असते कारण त्यांच्यात अशी काही कमतरता नसतेच.
मग जर हे अंतिमतः शरीराशीच जोडलेलं असेल तर स्त्रिया सतत दुय्यम गटातच मोडणार. त्या कायमच टार्गेट होणार. मग त्या सामान्य स्त्रिया असोत, पोलिस असोत वा लष्करात असोत. त्या तुलनेने दुय्यम राहणार आणि आत्ता आपण ज्या नजरेने स्त्री-पुरूष समानता बघतो ती कधीच येणार नाही.
----------------

तिच्या भोवतीच्या बायकांमध्ये असणारी इनसिक्युरिटी तिला जाणवते. नात्यातल्या बायका, ओळखीतल्या बायका आणि अगदी तिच्या वयाच्या मुलीसुद्धा. जुन्या पिढीतल्या अनेकजणी बांधून दिलेल्या नव-याला नावं ठेवत रडत कुढत संसार करत आहेत. कुणी संसारातल्या जबाबदारीचा मोठाच भाग उचलतंय, पण तरीही लहानसहान निर्णयांसाठी नव-यावरच अवलंबून आहे. शिक्षण असो वा लग्न, कुठलाच निर्णय स्वतः घेतलेला नसल्याने कुणी प्रचंड एकटेपणात आयुष्य काढतंय. परिस्थितीला दोष देत का होईना पण असा एकटेपणा पेलवणं खरंच अवघड आहे. कुणीतरी उद्योगात रमतंय, पण नव-याला त्याची जाणीव नसल्याची खंत जोडीला आहेच. या सगळ्यात तिला एक खोलवर दडलेलं रिकामपण दिसतं. जे भरून काढणा-या प्रेमाचा मोठा अभाव अनेकींच्या आयुष्यात आहे. अगदी सगळं चांगलं चाललेलं असतानासुद्धा! कुठली बाई किती सोसते आहे याचंच इतरजणी कौतुकमिश्रित सहानुभूतीनं वर्णन करतात. अनेक संसार हे वरवरच्या व्यवहारावर उभे राहिलेले आहेत. ज्यात बायकांना फक्त गृहित धरलं गेलंय आणि ते त्यांनी स्विकारलं आहे. पण त्यातून येणारं भावनिक एकटेपण त्या बोलून दाखवू शकत नाहीत. आणि रोजची कामं जोपर्यंत सुरळीत सुरू आहेत तोपर्यंत त्यांच्याजवळच्या पुरूषवर्गाला त्याची जाणीव होणं शक्य नाही.
दोन-पाच रूपयांसाठी बायका इतरांवर अवलंबून असतात. नवरा सगळा पगार बायकोच्या हातात देतो आणि त्या पैशात ती घराची मॅनेजमेंट बघते, हे दृश्य फक्त हिंदी पिक्चरमध्येच अस्तित्वात आहे. बायका सतत एक दडपण घेऊन वावरतात. स्वयंपाकाच्या कर्तव्याचं ते अनेकदा असतं. बाहेर गेल्यामुळे कधी त्यांना उशीर झाला तर अपराधी भावना घेऊन येतात. घरातल्या गृहिणीने सतत घरात असणं हे इतरांना इतकं सवयीचं झालेलं असतं की ते तिचं कर्तव्यच आहे असंच वाटत राहातं.

पिढीप्रमाणे प्रकार बदलले असतील पण वर्चस्वाची भावना तीच आहे. जी-मेल, फेसबुक अकाऊंट्सचा पासवर्ड मागणारे नवरे ती आता बघते आहे. 
-------------------

स्त्रिया स्वभावाने भावनिक असतात. पुरूषांच्या तुलनेत जास्त एक्सप्रेसिव्ह असतात. बारिकसारीक बोलणं हे एकूणच स्त्रियांचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. त्यावरून स्त्रियांवरच्या विनोदांत भर पडते. पण शेअरिंग ही त्यांची मुख्य भावनिक गरज असते. त्यांचा इंटरेस्ट सहसा माणसांमध्ये असतो, नात्यांमध्ये असतो. म्हणूनच स्त्रिया सामाजिक क्षेत्रांमध्ये, व्यवस्थापनामध्ये चांगलं काम करू शकतात असं म्हटलं जातं.

स्त्रियांचं विश्व असं शांतता, स्थैर्य मागणारं असतं. यात कुठलंही आव्हान नाही. ताकदीची स्पर्धा नाही. त्यामुळे यात तशी लढण्याची, जिंकण्याची मजा नाही. सामर्थ्याचं प्रदर्शन नाही. हे विश्व बळ आजमावण्यासाठी आसुसलेल्या जगाला कसं भावणार? त्यामुळेच बायकांच्या भावनिकतेची, अती काळजी घेण्याची, बोलण्याची चेष्टा होत राहाते. त्याचीही बायकांना सवय असते.
बायका छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतात. मनःस्वास्थ्य बिघडवून घेतात. कटकट करतात. स्वयंपाकघरातल्या सत्तेवरून दोन बायकांत चकमकी होतात. या सगळ्याकडे बघताना 'बायका अशाच असतात..' असा एक सूर पुरूषांचा असतो. पण त्यापलिकडे त्यांचं मुळातच हे छोटं भावविश्व आतापर्यंत चालत आलेलं आहे हे ते समजून घेत नाहीत. साहजिकच त्यात डोकावण्याची गरज त्यांना भासत नाही.
-------------

एका व्हॅलेंटाईन डेला गुगलच्या पेजवर तिने छोटीशी कार्टून स्टोरी पाहिली. टीन एजमधले एक मुलगा आणि मुलगी. मुलगी दोरउड्या मारते आहे. मुलगा तिला खुष करण्यासाठी फुलं घेऊन येतो आणि तिला देऊ करतो. ती त्याच्याकडे एकदा थांबून बघते आणि पुन्हा दोरउड्या मारायला लागते. मग तो दुसरं काहितरी घेऊन येतो. पुन्हा तसंच होतं. तो मग आणखी काय काय ट्राय करतो. तिच्या शेजारी फुलं, फुगे अशा भेटींचा ढीग जमा होतो. पण ती त्याला काही प्रतिसाद देत नाही. तो शेवटी थकतो आणि अगदी नाईलाज होऊन तिला काही देण्याचं सोडून देतो. एक दोरउडी घेऊन येतो आणि तिच्या शेजारी तोसुद्धा दोरउडी खेळायला लागतो. 'देणा-या'ची भूमिका सोडून तो आता एक कम्पॅनिअन, सोबती होतो. आता ती स्वतःहून थांबते आणि खुष होऊन त्याला मिठी मारते.
गुगलच्या पेजवरची ही छोटीशी स्टोरी त्या दिवशी खूपच गाजली. वस्तूंपेक्षा वेळ हवा, सोबत हवी हे त्यात कल्पकतेने मांडलं होतं.  
--------------

शारीरिक समानता स्त्री-पुरूषांमध्ये असू शकत नाही हे मान्य करायला हवं. तशी ती मानसिक पातळीवरही नाही याचं सुतोवाच संशोधनांतून झालेलं आहे.

स्त्रिया सगळ्या बाबतीत पुरूषांची बरोबरी करून स्वतःला सिद्ध करू पाहतात हे समानतेकडे नेणारं नाही. सगळं काही सारखं असण्यापेक्षा आपल्यातला फरक मान्य करून त्यानुसार पुढे जायला काय हरकत आहे? आपण समान नाही तर पूरक आहोत हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. हाच विचार एकमेकांना समजून घेण्यासाठी उपयोगी पडू शकतो.

स्त्रिया म्हणजे संवाद, सहकार्य, सेवा, निर्मिती, अहिंसा. या गुणांना ज्या ठिकाणी महत्त्व असेल तिथे कदाचित अशी समानता येऊ शकेल. पण हे सध्यातरी स्वप्नरंजनच.  

सध्या आपली पुरकता धुंडाळत राहावं हे उत्तम.
  

2 comments:

 1. क्या बात है...अप्रतिम...ही तुझी आत्तापर्यंतची सर्वोत्तम पोस्ट आहे....खूप मनापासून, आतून लिहिलंयस जाणवतंय...keep it up!

  ''स्त्रियांचं विश्व असं शांतता, स्थैर्य मागणारं असतं. यात कुठलंही आव्हान नाही. ताकदीची स्पर्धा नाही. त्यामुळे यात तशी लढण्याची, जिंकण्याची मजा नाही. सामर्थ्याचं प्रदर्शन नाही. हे विश्व बळ आजमावण्यासाठी आसुसलेल्या जगाला कसं भावणार? ''

  ''स्त्रिया म्हणजे संवाद, सहकार्य, सेवा, निर्मिती, अहिंसा. या गुणांना ज्या ठिकाणी महत्त्व असेल तिथे कदाचित अशी समानता येऊ शकेल. पण हे सध्यातरी स्वप्नरंजनच.

  सध्या आपली पूरकता धुंडाळत राहावं हे उत्तम.'' जेब्बात शीतल....किती खरं बोलशील...जियो...

  ReplyDelete
 2. sheetal khup marmikpane lihile ahes..ani vastustithi he ahech...

  ReplyDelete