Saturday, August 6, 2022

अणु

 

यु ट्यूबवर अस्ट्रो बॅकयार्ड नावाचं एक चॅनल आहे. त्यातला तो छांदिष्ट खगोली खांबाएवढ्या दणदणीत दुर्बिणी घेऊन एकशे वीस दशलक्ष प्रकाशवर्ष दूरवरची आकाशगंगा दाखवतो. अबबबब...........एकशे वीस दशलक्ष....प्रकाशवर्ष!!  इतका मोठ्ठ्ठा पल्ला कल्पनेलाही झेपत नाही. एवढ्या दूरच्या आकाशगंगेत अशाच कितीतरी सूर्यमाला. बाप रे! हे विश्व म्हणजे आहे तरी काय? आपण माणूस बनून हे पाहू शकतोय म्हणजे काय घडतंय?..माणसाचा मेंदू या विश्वाच्या अनंततेचं प्रतिक आहे काय...जो सतत विस्तारतोच आहे...

आपण या अनंत विश्वातल्या एका अणुसारखे आहोत. पण प्रत्यक्षातल्या अणुच्या तुलनेत करोडोंच्या अणुंचा ढीग आहोत. आपण कित्ती छोटे आहोत. आपलं अस्तित्व किती क्षणिक आहे..आपला काळ किती क्षणाचा आहे. आणि या काळात आपल्याबरोबर जे घडतं ते, आपल्या उलटसुलट फिरणाऱ्या भावभावना या तर या अवकाशातल्या न दिसणाऱ्या वायूसारख्या. आपलं अस्तित्व उद्या संपलं तर या अफाट काळाच्या कपाळावरची एक सुरकुतीही हलणार नाही.