Friday, November 23, 2012

चाँदनी


कबसे बैठे थे इस झील के किनारे
एक चाँद लेकर चाँदनी के ख्वाब में

एक दुजेमें मिटती लेहरोंको समायी हुई झील
लगती है खुद एक खयाल जैसी...
किनारेको किनारेसे जोडी हुई झील
जहाँ मिलता है रास्ता अपने आपसे
ढुंढते हुए किसी रोशनीको...

एक खयाल रात की रोशनी में डुबा 
चमकता रहा उस पार किनारेके
और हम देखते रहे आसमाँ की तरफ
करते गिनती चाँदनी की !

Thursday, October 25, 2012

सहजीवन


अडीच तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्याच्या औंध भागात काम
करताना ज्या अनेक लोकांच्या ओळखी झाल्या त्यातल्याच या दोन. पण त्या दोन्हीत एक गोष्ट समान होती. एक परिपक्व, समजदार सहजीवन.

नेरूरकर काका हे नोकरीतून रिटायर झालेले. चित्रकला हा त्यांचा छंद ते या निवांत वेळेत आता जोपासत होते. पक्ष्यांची वेगवेगळी चित्रं त्यांनी फोटोवरून तयार केली होती. त्यांच्या घरी कशाच्या निमित्ताने जाणं झालं आठवत नाही, पण गेले तेव्हा हॉलमध्ये बसलेली असताना आतून एक बाई आल्या. 'तुला एक जोक सांगू' असं म्हणून मला एकच विनोद पुन्हा पुन्हा सांगू लागल्या. त्या मनोरूग्ण होत्या हे कळत होतं. त्यांच्या मागोमागच काका बाहेर आले आणि त्यांनी त्यांना समजावून आत पाठवलं.

नंतर तीन-चारदा त्यांच्याकडे जाणं झालं. एकदा काकांनी सांगितलं, त्यांचा धाकटा तरूण मुलगा अचानक गेल्यामुळे त्यांच्या पत्नीला मानसिक धक्का बसला आणि तेव्हापासून त्यांची सगळी अवस्था ही एखाद्या लहान मुलासारखीच झाली. मला हे ऐकून इतकं आश्चर्य वाटलं नाही जेवढं काकांचा हे सांगतानाचा सूर बघून वाटलं. अगदी नेहमीसारखाच मृदू होता तो. त्यात उगाचच दुःख वगैरे असल्याचं जाणवलं नाही.

काकांनी एकदा त्यांची चित्रं दाखवली. एकदा त्यांचा फोटोंचा अल्बम दाखवला. बायकोचं कौतुक फोटो दाखवताना ते सांगत होते. त्यांचं अरेंज मॅरेज. पण तरी त्या दोघांचं एकमेकांशी इतकं जमलं की प्रेमात पडलेल्यांचंही काय जमावं. दोघांना नाटकाची आवड. लग्नानंतरच दोघंही एका ग्रुपशी जोडले गेले होते. नंतर मात्र काकांना या गोष्टीला वेळ द्यायला जमेना तेव्हा त्यांनी बायकोलाच पूर्ण सपोर्ट द्यायचं ठरवलं. फोटोतून बाई किती गोष्टींमधून सक्रिय होत्या ते कळत होतं. त्यांच्याविषयी सांगताना काकांच्या बोलण्यात त्यांच्याविषयीचं प्रेम, आदर जाणवत होता. या वयात येणारी उदासिनता त्यांच्यात नव्हती. एक शांतता होती. मुलगा त्यांचाही गेला होता. त्यानंतर बायकोचा हा धक्का त्यांना मिळाला होता. पण याविषयी तक्रारीचा सूर.. छे. सूक्ष्मसाही नाही.

एक काळ त्यांनी एकमेकांबरोबर चांगला घालवला होता. ते तर चांगलंच होतं. पण आता काही वाईट घडलंय. त्याचाही स्विकार होता. पण हा त्यांचा स्विकार दुःखातून नाईलाजाने आलेला नव्हता किंवा अगदीच आशावादीही नव्हता. जे आहे ते एका संतुलितपणातून ते भोगत होते इतकंच. एखाद्या तीन-चार वर्षांच्या मुलाची घ्यावी तशी बायकोची काळजी ते घेत होते मात्र त्याचा ताण त्यांच्या छंद जोपासण्यावर, लोकांशी असलेल्या नात्यांवर फारसा पडला नव्हता. घरात कुणी आलं की ते बायकोलाही त्यांची ओळख करून देत. त्यांना उगाचच त्यांची लाज वगैरे वाटत नसे. हे सगळं करताना ते स्वतःचा आनंदही सर्जनातून शोधत होते हे विशेष. एक वेळ हे सगळं एका स्त्रीने केलं असतं तर त्याचं तेवढं काही वाटलं नसतं.

म्हणूनच काकांचा हा दृष्टिकोन खूपच लक्षात राहिला. त्यांच्या तरूणपणातल्या आणि आताच्या सहजीवनाची जी सूक्ष्मशी झलक दिसली त्यामुळे तर जास्तच.

---------------

दुस-या काकांची ओळख पाषाणमध्ये झाली. तिथल्या अथश्री सोसायटीमध्ये ते जोडपं राहात होतं. न्युमरॉलॉजिस्ट काका सोसायटीमध्ये प्रसिद्ध होते. शिवाय कुठल्यातरी वाद्यातही प्रवीण होते. तिथल्याच दुस-या आजोबांकडून त्यांच्याविषयी कळलं म्हणून कुतूहलाने त्यांना मी भेटायला गेले.

काका अपंग. गुडघ्यांपासून पुढचे दोन्ही पाय नाहीत. ते सतत एका खुर्चीवर बसून. अगदीच गरज पडली तर नकली पायांचा आधार. काकू मात्र अगदी धडधाकट. काकांचा स्वभाव बोलका. काकूंचं मात्र उलट असावं. त्या काहीशा अबोल, आपलं काम शांतपणे करत राहणा-या.

पुन्हा त्यांच्याकडे कामाच्या निमित्ताने जाणं झालं तेव्हा काकांनी ब-याच गप्पा मारल्या. उत्साहाने त्यांची बासरी वाजवून दाखवली. संख्याशास्त्रावर बोलले. आमचं हे चालू असताना काकू तिथे शांतपणे कामं करत वावरत होत्या. मला पाणी आणून दे, त्यांचं स्वतःचं काही काम कर, मधेच काकांनी काही आणायला सांगितलं तर ते आणून दे असं त्यांचं चाललं होतं. मला राहून राहून या जोडीचं फार आश्चर्य वाटत होतं.


बोलताना काका मधेच म्हणाले, ' सगळं ही असल्यामुळे शक्य होतं. तिच्यात खूप डिटरमिनेशन आहे.'

ही संधी साधून मी त्यांना विचारलंच मग त्यांच्या लग्नाबद्दल. त्यांचं लव्ह मॅरेज असल्याचं ऐकून मला जास्तच कुतूहल वाटलं. त्यांनी सांगितलं, अठरा वर्षांचे ते असताना एका अपघातात त्यांचे दोन्ही पाय गेले. तेव्हापासून पुढे नकली पायांचाच आधार. ते आर्किटेक्ट होते. त्यांनी जिथे नोकरी केली तिथेच त्यांना काकू भेटल्या. मैत्री झाली आणि ते प्रेमातही पडले. लग्नाचा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र काकांनी काकूंना सगळी परिस्थिती समजावून दिली. अगदी आपले नकली पाय काढून त्यांना दाखवले. कारण तोपर्यंत त्या पायांमुळे त्यांच्या अपंगत्त्वाची फारशी जाणीव व्हायची नाही.

हे सगळं बघूनही काकूंचा निर्णय कायम होता. पण घरच्यांना समजावणं अवघड होतं. त्यातून ते दोघंही वेगळ्या प्रांतातले. काकू कच्छ प्रांतातल्या, बहुधा रजपूत तर काका मराठी ब्राह्मण. पण काकू ठाम राहील्या आणि शेवटी त्यांचं लग्न झालंच.

काकूही ही चर्चा ऐकत होत्या. न राहवून त्यांना विचारलं, अशी कोणती गोष्ट होती की ज्यासाठी काकांचं अपंगत्वही तुमच्यासाठी बाजूला पडलं?

त्यांचं उत्तर अगदीच साधं. ते कसे आहेत हे त्यांना माहित होतं. त्यांच्याशी जुळत होतं. त्यामुळे दुस-या कुणाचा विचार करावा असं कधीच वाटलं नाही. बस्स.

अवघड होतं. आयुष्यभर एक मोठीच जबाबदारी त्यांनी घेतली होती. पण आवडीच्या माणसाची घेतली होती. त्यात त्यांचं समाधान होतं. आज इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या समाधानात काही फरक पडला नव्हता हे दिसतच होतं.

मुळात एक अपंग माणूस आणि धडधाकट माणूस असं जोडपं. त्यातही त्यांचा प्रेम विवाह आणि इतक्या वर्षांनंतरही त्यातला आनंद, समाधान टिकून राहणं हे सगळं दुर्मिळ होतं माझ्यासाठी. एका प्रगल्भ सहजीवनाचा हा दुसरा अनुभव.

गार


पावसाचं पाणी अंगावर पडलं की कसं गार गार वाटतं.

उष्ण तळव्यावर उतरलेले थेंब पेरतात गारव्याला रंध्रारंध्रातून खोलवर. मनातही ती भिज उतरते आपोआप आणि मग उगाचच वाटत राहतं उत्फुल्ल...शांत...प्रसन्न वगैरे.

कुठल्याशा अज्ञात अवकाशातून आलेल्या त्या थेंबात एवढी ताकद असते!  

Monday, August 6, 2012

सर

सर आता चांगलीच लागलीय....

बाहेर बघताना वाटून गेलं.


येते खरी पण लहरी. पडते तर पडते नाही तर दिवसेंदिवस गायबच.


सरीला तिची लहर जपायची असते...आपल्याला आपली वेळ.


हिचं आतल्या सरीसारखं नाही.


आतली सर...येतच राहाते पुन्हा पुन्हा.


सरीनं यावं...हवं तेवढं राहावं...मग पुन्हा स्वच्छ आभाळ...


असं होतंच राहातं पुन्हा पुन्हा.


या बाहेरच्या सरीचा आतल्या सरीशी काही संबंध असेल का..


असतो असं म्हणतात लोक. कुणास ठाऊक, त्यांनाही जाणवत असेल कधी..


सर फक्त पाणी नाही...आणखीही आणते बरंच काही...


असं वाटतं तोवर, पाणीच पाणी होतं. 


बघता बघता बाहेरची सर आत येऊ पाहाते...


आतली सर बाहेर येऊ पाहाते....


दोघी कधी एक होतात कळतही नाही.


Friday, May 18, 2012

बाळ

एखादं लहान बाळ...अगदी काही महिन्यांचंच असतं...आपल्याकडे जेव्हा एकटक बघू लागतं तेव्हा किती वेगळी भावना मनात येते...


त्याची नजर आपल्यावर खिळलेली असते... निर्मळ आणि स्वच्छ ....चेह-यावरचा भावही अगदी नितळ असतो...आपण ती नजर तोडून दुसरीकडे बघू शकत नाही. ही त्याची नजर कुणातही वात्सल्याची भावना जागी करू शकते.


लहान बाळाचं रूप अगदी गोंडस असतं...त्याचा स्पर्श किती हवाहवासा...इवलेसे हात-पाय, चेह-यावर उठून दिसणारे पाणीदार डोळे...ब-याचदा काळेभोर असे...हात लावला तर काही होईल की काय असं वाटायला लावणारी नाजूक जिवणी, मऊसर त्वचा, डोक्यावरचं अलवार बाळसं....आणि नाजूकतेची परिसीमा गाठणा-या कानाच्या चुटूकशा पाळ्या...त्या टोचलेल्या असतात. त्यातल्या रिंगा ते बाळसेदार रूप आणखीनच खुलवतात...


या सगळ्याला कळत नकळत स्पर्श करताना आपल्या हालचालीही किती हळव्या होत असतात. आपण एरवी वावरताना ज्या बेफिकीरीने वावरत असू ते आपोआपच आता सावध हालचाल करू लागतो. हळुवारपणा आणू लागतो. मला तर सगळ्यात जास्त वेड लावते ती त्याची डुगडुगणारी मान...तिला आपण मागून हलकेच आधार देतो तेव्हा आपल्या जगाला सरावलेल्या मनाची त्या नुकत्याच आलेल्या जीवाच्या कच्चेपणाशी सांगडच घालतो जणू...




कडेवर घेऊन बाळाला झोपवणं हा एक अत्यंत सुखद अनुभव असतो. त्याचा चेहरा मधूनच खांद्याला स्पर्श करतो..छोटे बाळसेदार हात मानेभोवती पडतात..तेव्हा कशाचं काय माहित पण निर्भेळ असं समाधान वाटतं. त्याला हळुहळु थोपटताना त्याच्याबरोबर आपल्यालाही उगाचच सुरक्षित वाटू लागतं. खरं तर आपण त्याला विश्वास देत असतो...आपल्या असण्याचा...पण दुसरीकडे घेतही असतो स्वतःसाठी...


लहान बाळ म्हणजे त्याच्या अवतीभवतीच्या छोट्याशा जगाचं केंद्र होऊन बसतं. सगळ्यांनाच त्याच्याशी काहीबाही बोलायचं असतं...त्याला हातात घ्यायचं असतं...त्यानं आपल्यालाच प्रतिसाद द्यावा असं वाटत असतं...


त्याला खेळवताना, रडलं की शांत करताना आपण नक्की काय करत असतो ?
त्याच्या ब-यावाईट संवेदना ओळखण्याचा प्रयत्न करतो आपण. ज्याचे व्यक्त होण्याचे आपल्यासारखे ठोकताळे अजुन तयार झालेले नाहीत त्याची अभिव्यक्ती समजून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. त्याच्याशी त्याच्यासारखंच विशुद्ध भावनांचं व्हावं लागतं...म्हणूनच..बाळाला सांभाळणं हे एक आव्हान असतं.
त्याला आपण जिंकू शकलो की स्वतःलाच जिंकल्याचा आनंद होतो क्षणभर.







Friday, April 27, 2012

आला दिवस...गेला दिवस



आला दिवस.....गेला दिवस
अस्ताव्यस्त पसरल्या ढगांनी
संथ वाहून नेला दिवस...


दिवस होतो धूळच धूळ
दिवस वा-याच्या अंगातले खूळ
कधी दिवस होतो स्तब्ध पान
रिचवतो थंड शिडकाव्याची तहान


मंद आचेवर शिजवत ठेवल्यासारखा दिवस...


कधी आणतो कुठूनशी एक वावटळ
वावटळ म्हणजे असते वा-याच्या एका खोडीने
एकत्र आलेले धूळीचे चार कण..
या कणांचे कधीच नसते कसलेच काही म्हणणे
हवेबरोबर उंच उंच गोल गोल फिरत राहाणे


आला दिवस....गेला दिवस
दिशाहिन भटकत्या धुळीच्या कणांचा...


कधी दिवस झालाच पाऊस
तर धूळीचे कण होतात चिखल
तेव्हासुद्धा नसते त्यांचे कसलेच काही म्हणणे
पाय, चाक, पाणी...नेतील तिथे जाणे


आला दिवस....गेला दिवस
नेतो वाहून आपल्यासोबत असे असंख्य धूळीचे कण...

Tuesday, April 24, 2012

मंदिर


आपण इथं या वेळी का आलोय ?


आपल्या बौद्धिक आणि कलासक्त वातावरणाचा अभिमान असणा-या लोकांच्या शहरातलं हे श्रीमंत गणेशाचं प्रसिद्ध मंदिर आता बंद होईल थोड्याच वेळात.सकाळपासूनच रीघ लागलेली भक्तांची संख्या आता बरीच कमी झालीय. तरीही अजून काही थोडेजण आहेतच या मूर्तीसमोरच्या छोट्याशा जागेत. त्यापैकीच मी एक. 


वातावरण नेहमीप्रमाणेच प्रचंड तेजाळलेलं. सोन्याने अंगभर मढवलेला गणेश सामावून घेताना डोळे विस्फारताहेत. अर्धअधिक मंदिर चांदीच्या चमचमाटात दबून गेलंय. चारी बाजूंनी मारा होत असलेल्या प्रकाशामुळे या सगळ्या झगमगाटात अजूनच भर पडते आहे. 



गेल्या काही वर्षात या मंदिराची किर्ती बरीच पसरली आहे. इथल्या गणेशमूर्तीचा ठाशीव घाट लोकप्रिय आहे. शहरातल्या पानवाल्यापासून एखाद्या मोठ्या संस्थेच्या कार्यालयापर्यंत ती प्रतिमा सर्वत्र दिसते. चतुर्थीला भरपूर फळं, फुलं वापरून केलेली मंदिरातली आरास, गणेशोत्सवात मंदिराने खेचलेली भक्तांची संख्या, रात्री आरामात निघणारी त्याची प्रकाशमान विसर्जन मिरवणूक, कोण्या भक्ताने वाहिलेलं सोनं हे सगळं अत्यंत कुतूहलानं चर्चिलं जातं. दिवसेंदिवस या मंदिराची दानपेटी देणग्यांचे विक्रम करते आहे. हा गणपती नवसाला पावतो असं म्हणतात. अनेक श्रीमंतांच्या नवसाला तो पावला असावा !

इथं गणेशाचं दर्शन घेताना माझे हात नेहमीच क्षणभर स्तब्ध होतात. नजर एका जागी ठरत नाही. प्रत्येक वेळी ती मूर्ती नवीन वाटते. त्या सगळ्या झगमगाटाचा भार मनाला फार पेलता येत नाही. मग ते दर्शन नमस्कार करायचा, प्रसाद घ्यायचा आणि पुन्हा चप्पल काढलेल्या ठिकाणी जायचं, असं औपचारिक होतं....


पण आज इथे थोडा वेळ बसावसं वाटतंय.


ही आभूषित मूर्ती..सुंदर दिसतेय...कोणी घडवली असेल ती?..ज्याने घडवली त्याची गणेशावर श्रद्धा असेल?..कुठला भाव ओतला असेल त्याने ती घडवताना?.. सर्वसामान्य लोकांच्या मनातही या मूर्तीला नमस्कार करताना कुठल्या भावना येत असतील?..भक्तीभावाने केल्या जाणा-या नमस्कारांत कुठेतरी या सोन्याच्या झळाळीचं आकर्षण मिसळलेलं असेल का?..गणेशालाच ठाऊक! तशी या शहरात गल्लोगल्ली गणेशाची छोटी मोठी मंदिरं आहेत. त्या त्या गल्लीतल्या लोकांची त्या त्या गणेशावर श्रद्धा आहे. पण याच मंदिरात भक्त दूरदूरून येऊन गर्दी करतात.


मंदिरात येणा-या प्रत्येक व्यक्तीला आपण 'भक्त' म्हणतो. देवावर असलेला ठाम विश्वास म्हणजेच भक्ती असं म्हणतात. त्या अर्थाने येणारा प्रत्येक माणूस 'भक्त' म्हणावा काय ?..संतांचा असा स्वतःच्याही पलिकडे विश्वास त्यांच्या देवावर होता. आज या मूर्तीमध्ये असलेल्या देवत्त्वावर माझा पूर्ण विश्वास आहे असं तिच्या भोवती लगबग करणारे पुजारी तरी छातीठोकपणे सांगू शकतील ?


थोडा पुढे डावीकडे बसलेला एक विशीतला मुलगा पुढे मागे झुलत, प्रमाणापेक्षा मोठ्या आवाजात आणि काहीशा कर्कश्श सुरात गणपती अथर्वशीर्षाची आवर्तनं करतोय. लोक त्याच्याकडे बघताहेत हे त्याला कळत असावं. तरीही एका उंच पट्टीत निर्विकार आणि यांत्रिकपणे त्याचं पठण सुरू आहे. तो उच्चारत असलेल्या शब्दांचा अर्थ त्याला माहित आहे का?


त्याच्यासारखी अनेक माणसं आहेत. ती पोथ्या वाचतात. पूजा करतात. अभिषेक करतात. व्रतं करतात. उपास करतात. नवस बोलतात. तो फेडतात. ठराविक दिवशी ठराविक देवाला जातात. ठराविक काळात ठराविक देवस्थानांना भेटी देतात... या सगळ्यामागची प्रेरणा नेमकी काय असेल?.... आपण का आलोय इथे?.. समोरच्या शाडूच्या मूर्तीत गणेश नावाच्या देवाचा अंश आहे असं आपण मानतो..मानतो!..खरंच तसं असेलच असं नाही.


थोडं पुढे एक कुटुंब बसलंय. दूरवरून आलं असावं. त्यातली एक छोटीशी मुलगी फारच चुळबूळ करते आहे. तिचे वडील तिला नमस्कार करायला शिकवताहेत. पण ती त्या डावीकडच्या मोठ्याने पठण करणा-या मुलाकडेच टकमक बघते आहे.


देवावर आपण ठेवलेली श्रद्धा म्हणजे लहानपणापासून लावल्या जाणा-या अशा सवयीच तर नसतील?


आपण अमुक अमुक देवाची पूजा करावी हे आपला धर्म, जात, आर्थिक स्तर यांच्यानुसार आपल्यावर लहानपणीच बिंबत जातं. न कळत्या वयातच आपण त्यावर विश्वास ठेवायला शिकतो. मग पुढच्या सगळ्या धार्मिक मानल्या जाणा-या कृती अशा सवयीच्या विश्वासाआधारेच होतात.


कुठल्या तरी देवावर श्रद्धा ठेवणं हीसुद्धा आपली एक मुलभूत गरज असावी. आपल्याकडे बघणारं कुणीतरी आहे या जाणीवेमागे दडलेल्या सुरक्षिततेच्या भावनेसाठी ती निर्माण होत असेल का?

'मी' चा अहंकार पूर्णपणे विसरणं म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचं शिखर गाठल्याचं लक्षण, असं म्हणतात. कुठलाही धार्मिक विधी करताना ही 'स्व' विसरण्याची सुरूवात होते? व्यावहारिक जगातला देवघेवीचा नियम लावूनच ते बहुधा केले जातात. आत्ता इथेसुद्धा गणेशापुढे नतमस्तक होताना कितीतरी जणांनी काय काय मागितलं असेल. खरं तर बाहेर चप्पल काढताना अजून एक सूचना केली जायला हवी, 'मी पणाही इथेच सोडावा !

'समोरचा तुकतुकीत त्वचेचा, गणेशासारखाच लंबोदर पुजारी वर्ग आता आवराआवरीला लागलाय. मूर्तीच्या अंगावरचे दागिने उतरवायला सुरूवात झाली आहे. गणेशाचे खांदे, हात, पोट हळूहळू मोकळे होत आहेत त्या तेजाच्या भारातून. जगाची विघ्नं हरणा-या त्या गणाधीशानंही सुटकेचा निश्वास सोडला असेल मनातल्या मनात. खरंच...ही मूर्ती जिवंत असती तर.. अंगावरचं ओझं हटल्यानंतर गणेशानं चारी हात आणि सोंडेसहित आळोखेपिळोखे दिले असते. दिवसभर मांडी घालून मुंग्या आल्या म्हणून पाय झटकले असते. भक्तांच्या त्याच त्याच मागण्या ऐकून कान किटलेला गणेश 'जरा फिरून येतो' म्हणून पुजा-याला टाटा करून गेला असता...खरंच.. मजा आली असती...


कल्पनेच्या राज्यात फेरफटका मारणं हा मनोरंजनाचा विनाखर्चाचा उत्तम उपाय आहे.


दागिने काढल्यानंतरची मूर्ती किती साधी वाटतेय. एरवी ह्या गणेशाचं हे रूप बघायला मिळालं नसतं. या वेळेचा हा एक दुर्मिळ फायदा आहे !