Saturday, August 7, 2021

लिहिणे

  

लिहिणे ही माझ्यासाठी एक कष्टदायक प्रक्रिया आहे. काही लोक सुरुवातीपासून शेवटपर्यंत सलग लिहितात. मला ते जमत नाही. मी थांबत खाडाखोड करत चालणार. खाडाखोडीशिवाय कधी काहीही पूर्ण लिहिल्याचं मला आठवत नाही. उत्तरपत्रिका असो की आणखी काही. शाळेत मला दीर्घ उत्तरे नीटनेटकी लिहिणे कधीच जमले नाही. उत्तरात आशय काय असावा, असे लिहावे की तसे याचे माझे द्वंद्व लवकर संपतच नसे. आणि वर हे द्वंद्व सुरु असताना विचार क्षणार्धात वेगळ्याच विश्वात जात असत आणि मी त्यात स्वतःला हरवून बसत असे. प्रश्नाच्या उत्तराशी मी परत येईपर्यंत अर्थातच वेळ बराच पुढे गेलेला असे. आणि मग माझी घाईगडबड उडे. परंतु अमूक प्रश्नाचे उत्तर असे असायला हवे याचा अंतिम निर्णय होऊन ते तसे नीट लिहिले गेले आहे असे कधी झाल्याचे मला आठवत नाही. यापेक्षा पाठांतर बरे. याचसाठी मला संस्कृत आवडायचे. कारण ते पाठांतरावर होते आणि पाठांतराने मला शक्यतो कधी दगा दिला नाही. पण दीर्घ उत्तरे, वर्णनपर काही किंवा निबंध वगैरे आले की आम्ही बुडालोच गंगेच्या पाण्यात.

म्हणून लिहिणे- स्वतःचे लिहिणे ही माझ्यासाठी कष्टदायक प्रक्रीया आहे. मात्र ती पूर्वी तितकी नव्हती. पूर्वी मी काही सुचले की दूध उतू गेल्याच्या धावेने लिहायला बसत असे. नववीत असताना एक एकांकिका लिहून मी कौतुक मिळवले होते. त्यानंतरही क्वचित काहीबाही लिहिलेच होते. आपण पुढे जाऊन मोठे लेखक होऊन किर्ती मिळवणार आहोत ही माझी आत्मगौरवी कल्पना होती. आणि ती अलिकडे इतक्या वर्षांपर्यंत कधी अस्ताला गेली नाही.

परंतु लिहिणे हे आपल्यासाठी अवघड बनत असल्याचे मात्र मला जाणवू लागले. उगाचच स्वतःला कुरतडत असल्यासारखे वाटू लागले. आताही हे लिहित असताना लॅपटॉपवर फाईल उघडून बसले तरी प्रत्यक्षात माझ्या मनातील वाक्ये आणि ती समोर उमटणे यात एक मोठी अदृश्य भिंत असल्यासारखे जाणवू लागले. लिहायला बसले की सुचणे बंद होते आणि मी ठप्प होते. लिहिलेले शब्द चक्क अपरिचित वाटू लागतात आणि हेच लिहायचे होते की नाही याबद्द्ल पुन्हा द्वंद्व सुरु होते. एखादे वाक्य लिहिणे म्हणजे आपण काही फार विशेष करत आहोत असे वाटते की काय कोण जाणे. पण ही कसली तरी आडकाठी आहे हे नक्कीच.

आता हे एवढे कागदावर उतरवण्यासाठीही मला दोनतीनदा प्रयत्न करावे लागले आहेत. लेख तपासणीचे जे काम सुरु आहे त्यातला फॉन्ट ठेवून मी पाहिला. हे थोडे कामी आले. पण तरीही लॅपटॉपवर लिहिणे ही काहितरी भानगड आहेच.

कारण आत्ता गेले कित्येक दिवस मनात घोळत असलेले जे मी लिहिण्यास सुरुवात केली ती हाताने कागदावर आणि पेन्सिलीने. पेन्सिल ही लिहिण्यासाठी मला उत्तम आहे. ती कायम माझा वेग पकडते.

खरे म्हणजे विचार तेच असतील तर ते पेनने असो वा लॅपटॉप, लिहिले जायला हवे, नाही का?

पण एवढे सोपे नाही हे. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे!

आज हे लिहावेसे मला वाटू लागले कारण अचानक काही ना काही मनात उमटण्यास सुरुवात झाली. वाक्येच्या वाक्ये आणि अगदी परिच्छेद. एकामागोमाग दहा आणखी वेगळ्या गोष्टी. विचारांची एवढी गर्दी झाली आहे की ते काढल्याशिवाय थांबणार नाहीत बहुतेक. एकुणातच वेगवेगळ्या गोष्टींनी डोके एवढे भणाणून गेले की ते तसेच ठेवणे योग्य नाही. म्हणून लिहिणे आलेच. लिहिण्याने विचार मोकळे होतात की आणखी मोठे होतात हे ही मला पाहायचे आहे.

लिहिण्याकडे केवळ काही लोकांची निर्मिती प्रक्रिया म्हणून न पाहता एक मानसिक व्यायाम म्हणूनही पाहिले पाहिजे असे मला वाटत आलेय. नीट व्यक्त होणे हे मुले यातून शिकू शकतात. बोलताना, विचार करताना आपले कसेही फिरणारे विचार लिहिताना आपल्याला एका जागी नीट बसवता येतात आणि त्यांची तपासणीही करता येते. करायचे ठरवले तर. विचारांना शब्दांत मांडून आकाररूप देता येते आणि हे करताना त्यावरचेही काही हाती लागू शकते. सगळ्यात महत्त्वाचे स्वतःकडे अलिप्ततेने पाहता येते. लिहिण्याने आपण स्वतःच्याच विचारांकडे आपण लक्षपूर्वक पाहू लागतो. शिवाय ज्या गोष्टींबद्दल जे लिहित आहोत ते स्विकारण्याचीही अंतःक्रिया होत असावी. जे लोक काल्पनिक लिहू शकतात ते तर आहेतच, पण ज्यांना आपल्या विचारांची तपासणी करायची आहे आणि काही अडथळे असतील तर ते दूर करायचे आहेत त्यांनी नियमित लिखाण करावे. म्हणून लिहिणे आणि नाटक या दोन गोष्टी मानसोपचारातही वापरले जायला हव्यात असे माझे मत आहे. होतही असेल कदाचित. पण शाळांत तर ते घेतले जायला हवेच. असो.

एका अद्भुत अनुभवाने आपले आयुष्य अक्षरशः उलटेपालटे केले. पण त्याबद्दल अर्थातच मी इथे लिहिणार नाही. नाहीतर बाकीचे सगळेच गुंडाळून ठेवावे लागेल. 

एकिकडे मनात अत्यंत गंभीर गोष्टी सुरु असताना आपण हे काय लिहित आहोत हे ही मला प्रचंड नवलाचे आहे. म्हणजे पाहा, आपल्या मनाला किती स्तर असतात. आपण हसत असलो म्हणजे आपण आनंदी असतो असे नव्हे, किंवा शांत असलो म्हणजे खिन्नच असतो असेही नाही. पृष्ठभागावरून सुरु असलेल्या या गोष्टी. त्यांच्या मागे किंवा समांतर असणारे तात्कालिक ताण आणि यातून दीर्घ तळाशी साठत जाणारा गाळ. तो सुपीक आहे की नापीक?

नाही नाही म्हणत आपण कुंपण तोडून धावत सुटलो की काय असे वाटू लागलेय. पाणी सोडल्यावर एखाद्या नळीतून सुरुवातीला कमी दाबाने आणि नंतर एकदम भसकन येतं तशा नवनव्या गोष्टी मनात वेगळी गर्दी करू लागल्या आहेत. जेव्हा मनात येईल तेव्हाच ते लिहिले गेलेले चांगले असते. वारंवार तेच घुमवून डोके खराब होत नाही.

कुणी हे वाचावे म्हणून मी हे लिहित नाही. (पण यात थोडे खोटे आहे, कारण त्यासाठीच तर ते इथे टाकले आहे.) हे कुणी फार वाचेल असेही नाही. कारण आपण काही सोशल मिडियावाले राहिलो नाही. कुणी हे वाचावे म्हणून मी हे आवर्जून कुणाला पाठवायलाही जाणार नाही. त्यामुळेच की काय, काय काय सुचते आहे. 

No comments:

Post a Comment